छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो ः पुण्यावरून नागपूरला जाणारी झिंगबस कंपनीची ट्रॅव्हल्स आज सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अपघातग्रस्त झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅव्हल्स थेट पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून २५ प्रवाशी जखमी झाले आहेत. साई पाटील असे ठार झालेल्या प्रवाशाचे नाव असून तो ट्रॅव्हल्स कंपनीत मदतनीस म्हणून काम करीत होता, असे समजते. दरम्यान जखमी प्रवाशांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
प्राथमिक माहितीनुसार पुण्यावरून निघालेली झिंगबस कंपनीची ट्रॅव्हल्स (क्र. एमएच ४३ सीके ०८००) २६ प्रवाशांना घेऊन अमरावतीला जात होती. केंब्रिज चौकाजवळील पुलावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले. वेग प्रचंड असल्याने बस पुलाचा संरक्षक कठडा तोडून थेट खाली कोसळली. पहाटेच्या शांततेत झालेल्या या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बस पुलावरून खाली कोसळताच बसमध्ये गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये एकच हाहाकार माजला.
बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असून आतील प्रवासी मदतीसाठी आक्रोश करत होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने ११२ वर कॉल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नागरिकांच्या मदतीने बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला, जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही आहे. जखमी झालेल्या २५ प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.
जखमी प्रवाशांची नावे...
पायल लोखंडे वय ३० रा. नागपुर, नेहल सुनिल वाशिक (२८) रा. निगडी पुणे, राजकन्या चरणदास (५२) रा. अमरावती, उमेश रंगनाथ इंगोले (४१) रा. अमरावती, पवन विलास बरगे (२६) रा. फलटण, रोहन वसंतराव दळवे (२६) रा. मुखड अमरावती, आरव सोनू लोखंडे (१) रा. नागपूर, योगेश सुभानराव देशमुख (३३) रा. अमरावती, जगन राजू थोरात (४०) रा. अमरावती, चेतन प्रकाश ठाकरे (३२) रा. बोरगाव अमरावती, श्यामल श्यामसुंदर राऊत (२७) रा. बोरगाव अमरावती, श्रुतिक गौतम वानखेडे (३०) रा. नागपूर, सागर गंगाधर सपटे (३९) रा.अमरावती, सोनी जयदिप कांबळे (२५) रा. पूणे.













